विशेष प्रतिनिधी, मुंबई / नवी दिल्ली
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहभागी झालेल्या नवीन मंत्र्यांनी देशभरात ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली असून कार्यकर्ते आणि नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सहाजिकच त्यामुळे कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन असून प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ४२ एफआयआर नोंदवले आहेत. विविध कलमांसह साथीच्या कायद्याखाली नोंदवलेल्या या गुन्ह्यामध्ये मंत्री आणि कार्यकर्त्यांवर मुंबईच्या विविध भागात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोविड -19 नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाकडून यापूर्वी मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल १७ एफआयआर दाखल केले होते. २० ऑगस्टपर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात १९ एफआयआर नोंदवण्यात आले होते.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी लादलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत राणे यांनी १९ ऑगस्ट रोजी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. राज्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असताना अनेक विरोधी नेत्यांनी रॅली काढल्याचा निषेध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑगस्ट रोजी केंद्रातील नवनियुक्त मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढणार असल्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे दुसरी कडे आसाम मध्ये देखील भाजपच्या राज्य शाखेने ‘जन आशीर्वाद यात्रा’ आयोजित केली होती. त्यात सरकारी अधिकारी हे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या ‘स्वागत कार्यक्रमात’ सहभागी झाले होते. या ठिकाणी २०० हून अधिक लोकांच्या उपस्थितीमुळे कोविड -१९ प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. या संदर्भात, गुवाहाटी पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रारींची चौकशी करत गुन्हा दाखल केला .