नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या अर्थकारणाचा एक प्रमुख भाग असलेल्या वाईन उद्योगाने अजून एक भरारी घेतली असून जांभळा पासून निर्मित रेझवेरा या वाईन च्या टेस्टिंग लाउंज चा शुभारंभ येथील गंगापूर-सावरगाव रोड येथील द कोबल स्ट्रीट येथे करण्यात आला. नाशिकला “भारताची वाईन कॅपिटल” म्हणून ओळखले जाते तेथील हवामान आणि निसर्गसौंदर्य यामुळे देशभरातील तसेच परदेशातूनही पर्यटक यांचा नाशिककडे ओढा असतो. यातच गेल्या काही वर्षापासून वाईन टूर आणि वाईन टेस्टिंग साठी पर्यटकांची नाशिकला पसंती आहे. द्राक्षाच्या वाईन नंतर आता पर्यटकांना जांभळाच्या वाईन चा एक पर्याय उपलब्ध होत आहे.
जांभूळ हे फळ प्रामुख्याने जंगलात सापडणारे फळ असून आदिवासी समुदयाच्या उपजीविकेचे एक साधन आहे. या सेंद्रिय पद्धतीने मिळणाऱ्या जांभुळांना आधी एकत्रित केले जाते त्यानंतर त्याला स्वच्छ करून त्याचा पल्प काढला जाऊन मग त्या पासून ही वाईन तयार केली जाते .आदिवासी कडून हे फळ प्रामुख्याने घेण्यात येते त्यामुळे आदिवासींना भर उन्हाळ्यात रोजगाराचे एक साधन मिळाले आहे .
जांभूळ हे मधुमेह , हृदयविकार आणि पचन विकारावर उपयुक्त आहे, पण वर्षाच्या केवळ दोनच महिन्यात मिळणाऱ्या या फळावर योग्य प्रक्रिया केल्याने त्याचा उपयोग वर्षभर करता येऊ शकतो . अनेक रिसर्च करून या वाईन ची निर्मिती केली असल्याचे सह-संस्थापक आणि उत्पादन प्रमुख निखिल खोडे यांनी नमूद केले. ते म्हणाले की भारतातील वाईनचा इतिहास 5000 वर्षांचा आहे आणि जुन्या वेदांमध्ये सुद्धा जांभळाच्या फळांना खूप महत्व देण्यात आले आहे . एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत, भारत सरकारने नाशिकसाठी वाईनला मुख्य उत्पादन म्हणून मान्यता दिली. जांभूळ ,तुती, जॅकफ्रूट, इंडियन गूजबेरी, सफरचंद आणि आंबा यांसारख्या देशी फळांचा उल्लेख ऋग्वेदात पण आढळतो, या फळांचे आरोग्य फायदे सिद्ध झाले आहेत. या मूळ भारतीय फळांना लोकप्रिय बनवण्याची आणि सध्याच्या काळात त्यांचा ठसा जागतिक स्तरावर उमटवण्याची गरज आहे. रेझवेरा ही मूळ भारतीय फळांवर प्रक्रिया करून तयार करण्यात आली असून आपल्या देशातील मूळ फळांच्या या मेड-इन-इंडिया वाईनचा प्रचार करणे आवश्यक आहे” असेही ते म्हणाले .
रेझवेरा एक समृद्ध, विलासी चव तयार करते जी तुमची मोहक जीवनशैली वाढवते. या वाइनचा मोहक सुगंध बहुतेक जेवणांसोबत एक परिपूर्ण जोडी बनवतो. ज्यांना अल्कोहोलिक ड्रिंकची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी जांभूळ फळ एक आश्चर्यकारक पर्याय आहे. ब्रँडचा हेतू अल्कोहोल ब्रँड बनण्याचा नसून , तर लोकांना एक स्वादिष्ट अनुभव देण्याचा आहे असे सह-संस्थापक आणि संचालिका कोमल सोमाणी म्हणाल्या या वेगळेपणाचा अनुभव अधिक प्रभावीपणे घेता यावा या साठी एका वेगळ्या कल्पनेवर रेझवेरा लाउंज तयार केले आहे. , संध्याकाळी तर या लाऊन्ज चा अनुभव अजूनच अदभूत होतो . तेव्हा उत्कृष्ट खाद्यपदार्थांसह पूरक असलेल्या जगातील पहिल्या जांभूळ वाईनचा आस्वाद एक वेगळीच अनुभूती देऊन जाते असेही त्यांनी नमूद केले.” संचालक डॉ नीरज अग्रवाल म्हणाले, “या नवीन लाउंजमध्ये रेझवेरा प्रेमींनी ग्लास वाईनचा आस्वाद घेतल्यानंतर आरक्षित भागात काही जांभूळ वृक्षांची लागवड देखील होईल. आत्तापर्यंत रेझवेरा टीम आणि रेझवेरा शी संबंधित सर्व आदिवासी लोकांनी गेल्या 6 वर्षात १ लक्ष पेक्षा जास्त झाडे लावली आहेत.