नवी दिल्ली – जमू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या शिक्षकांना नायब राज्यपालांनी बडतर्फ केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी तयार केलेल्या अहवालात त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती सादर केली आहे. युवकांचे ब्रेन वॉश करून त्यांना दगडफेकीचे प्रशिक्षण दिले जात होते. काही युवक हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करत होते. तर काही जमातसारख्या दहशतवादी संघटनांसाठी देशविरोधी कारवाया करत होते. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या अशा काही शिक्षकांची नावे आमच्या हाती आली आहेत.
अब्दुल गनी तांत्रे
याचे हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनेसोबत १९९० पासून संबंध आहेत. तांत्रे १९९० पासून अनंतनाग येथील हांजी मोहल्ला बटेंगू माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने पगारी रजेचा अर्ज देऊन आपला लहान भाऊ निसार अहमद तांत्रे याला कंत्राटी शिक्षकपदी रुजू करून घेतले. त्यानंतर तो त्या पदावर कायम झाला. दोन्ही भावांनी मिळून युवकांचे ब्रेन वॉश करून दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचे काम सुरू केले. हिजबुलचा सूत्रधार सलाहुद्दीनचा निकटवर्तीय म्हणून निसार अहमद तांत्रे ओळखला जाऊ लागला. निसारचा मुलगा पाकिस्तानात शिक्षण घेत आहे. त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च सहाहुद्दीनच करत आहे.
मोहम्मद जब्बार पर्रे
जिल्हा परिषद आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापकपदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या पर्रे याला जमात-ए-इस्लामीमध्ये छोटा गिलानी म्हणून ओळखले जाते. तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला होता. परंतु मागील सरकारांनी त्याला देशविरोधी कारवाया करण्यापासून रोखले नाही. जमातची विद्यार्थ्यांची संघटना जमात-ए-तुल्बामध्ये तो कार्यरत होता. युवकांना दगडफेक करण्यासाठी तो प्रोत्साहन देत होता. पर्रे हा दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रा (जनाजा) आयोजित करत होता. त्याने एकट्याने बिजबिहाडामध्ये दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत १२ हून अधिक युवकांना दहशतवादी कृत्यात सहभागी करवून घेतले. मशिदींमध्ये युवकांना कट्टरवादी बनविण्याचे कामही तो करत होता. अनंतनाग जिल्ह्यात त्याने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कारवायात मदत केली होती.
रझिया सुलतान
अनंतनागमध्ये खिरम शाळेची प्रमुख रझियाला तिच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळाली होती. रझियाचे वडील सुलतान भट्ट जमात-ए-इस्लामी संघटनेचे समर्थक होते. परंतु धोका दिल्याच्या आरोपावरून दहशतवाद्यांनी त्यांना १९९६ मध्ये ठार केले होते. सुरक्षा यंत्रणांनी रझियावर नजर ठेवली होती. जमान आणि दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनांशी संबंध असल्याचा अहवाल सरकारला सुपूर्द केला होता. परंतु तिच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अहवालानुसार, जमात व दख्तरान-ए-मिल्लतसाठी रझिया सभा घेत होती. शिक्षक असूनही लोकांच्या मनात देशाविरोधी द्वेष निर्माण करत होती.
सकीन अख्तर
अनंतनागच्या गोरजन शिरम प्राथमिक शाळेत सकीन अख्तर कंत्राटी शिक्षिका होती. २००८ मध्ये ती कायम झाली. सकीन देशविरोधी कामांना प्रोत्साहन देत होती. ती दुख्तरान-ए-मिल्लत कारवायाशी संबंधित होती. सरकारी वेतन घेऊन सकीन पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी संघटनांच्या इशार्यांवरून कामे करत होती.