इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जम्मूमधील चड्ढा कँपजवळ आज पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)च्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. सीआयएसएफचे १५ जवान बसमधून ड्युटीवर जात असताना हा हल्ला करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जम्मूच्या चड्ढा कँपजवळ पहाटे सव्वाचारच्या सुमारास सीआयएसएफचे १५ जवान सकाळच्या शिफ्टसाठी ड्युटीवर जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआयएसएफने प्रतिकार केल्यानंतर दहशतवाद्यांनी पलायन केले. या हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एएसआय जवान शहीद झाला, तर इतर दोन जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याशिवाय जम्मूमधील सुंजवान परिसरात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत.
https://twitter.com/CISFHQrs/status/1517341845445316608?s=20&t=Rr6nJ2M2P13FT1Q8XJsNVg
तत्पूर्वी जम्मूच्या सुंजवान परिसरात पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. पहाटे एके-४७ च्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सांबा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. त्यापूर्वी एका घरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती.
माहिती कन्फर्म झाल्यानंतर सुरक्षा दलाने मध्यरात्री परिसरातील घराला वेढा दिला. दहशतवाद्यांनी अंधारात गोळीबार सुरू केला, त्यामध्ये एक जवान शहीद झाला आणि काही जखमी झाले. दहशतवादी घरातच लपल्याचा आम्हाला विश्वास आहे. त्याच आधारावर ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिली.