नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू पोलिसांनी दहशतवादी तालिब हुसैन शाह आणि त्याच्या साथीदारांना रविवारी (दि. ३) सकाळी अटक केली. रियासी परिसरात ग्रामस्थांनी या दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अटक केलेला दहशतवादी तालिब शाह एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांकडून पोलिसांना दोन एके ४७ रायफल, ग्रेनेड, इतर अनेक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात गोळ्या जप्त केल्या आहेत.
जम्मूमध्ये दहशतवाद्यांवर कारवाया होत असतात. पण एखादा दहशतवादी हा एखाद्या राजकीय पक्षाच्या आयटी सेलमध्ये काम करणारा निघावा हे मात्र अपवादानेच दिसते. या प्रकरणात तसे झाले आहे. तालिब हुसैन शाह हा एकेकाळी भाजप आयटी सेलचा प्रभारी असल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले, “ऑनलाइन सदस्यत्व घेण्याचा हाच तोटा आहे की तुम्ही कोणाचीही पार्श्वभूमी न तपासता पक्षाचे सदस्यत्व देता. या दहशतवाद्याच्या अटकेनंतर हा मोठा आणि अतिशय गंभीर मुद्दा समोर आला आहे. कोणीही पक्षात प्रवेश करुन रेकी करतो हे अतिशय चिंतेचे आहे. या रेकीतूनच पुढे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला मारण्याचा दहशतवादी कट रचतात. मात्र, कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली ही बाब दिलासादायक आहे. सीमेवर अनेक लोक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
https://twitter.com/igpjmu/status/1543458165874098176?s=20&t=dPRc7cuWk7jGuTvXWnk_tA
अटक केलेला दहशतवादी शाह याला ९ मे रोजी भाजपने जम्मू क्षेत्राचे आयटी आणि सोशल मीडिया प्रमुख बनवले होते. ‘श्री तालिब हुसैन शाह हे दराज कोटरंका, बुधान, जि. राजौरी येथील भाजप अल्पसंख्याक आघाडी जम्मू प्रांताचे नवीन आयटी आणि सोशल मीडिया प्रभारी असतील’ असे त्यावेळी भाजप अल्पसंख्याक आघाडी जम्मू आणि काश्मीरने जारी केलेल्या आदेशात म्हटले होते. यानंतर दहशतवादी तालिब हुसैन शाहचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे बरेचसे फोटोही समोर आले होते. जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबतही तालिब हुसैन शाह यांचेही अनेक फोटो आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि पोलिस प्रमुखांनी दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, इथून पुढे आयटी सेलची जबाबदारी देतानाही काळजी घ्यावी लागणार असल्याचे मतही संबंधितांकडून व्यक्त केले जात आहे.
https://twitter.com/igpjmu/status/1543458633308336129?s=20&t=L9gzwPU8okWB8FG9u7IKxg
Jammu Arrested Terrorist BJP Social Media Cell Chief BJP says