इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबण्याचे नाव घेत नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. मीर यांच्या घराजवळील भातशेतीत त्यांचा मृतदेह आढळून आला. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात ही घटना घडली आहे.
उपनिरीक्षक फारुख अहमद मीर काल संध्याकाळी घरातून शेताकडे निघाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले आणि जवळच्या शेतात नेऊन गोळ्या झाडून हत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर पिस्तुलाने गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात टार्गेट किलींग (विशिष्ट व्यक्तीची ठरवून हत्या) केले जात आहे. यापूर्वी बँक मॅनेजरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.