चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नार-पार नदीजोड प्रकल्प केंद्र सरकारने नामंजूर केल्यामुळे खान्देश हित संग्राम संघटना, जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह इतर संघटनांनी थेट नदीत उतरत आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले.
या योजनेसाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरु करण्यात आल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. जळगावच्या चाळीसगांव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील हे स्वत: सहभागी झाल्यामुळे या आंदोलनाचा विशेष महत्त्व आले आहे.
केंद्र सरकारने नार-पार प्रकल्प रद्द केल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी संसदेत दिली. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षिरीने नार-पारचा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पण तरीही नागरिकांमध्ये या संताप असून त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. दरम्यान जोपर्यंत नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत गिरणा नदी पात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.