जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या सर्वसामान्य माणसाने चांगले काम केले तर ते चार-दोन लोकांपर्यंत पोहोचतं. पण एखाद्या अधिकाऱ्याने चांगले काम केले किंवा समाजापुढे आदर्श निर्माण करणारे काम केले की त्याची लगेच चर्चा होते. कारण सरकारी अधिकाऱ्यांकडून अशा कामाची कुणीच अपेक्षा केलेली नसते. जालन्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस वर्षा मीना यांची सध्या अशाच एका आदर्श निर्णयाची चर्चा राज्यभर होत आहे.
वर्षा मीना जालना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सरकारी अधिकारी म्हटल्यावर सरकारी शाळांबद्दल चांगले बोलणे आलेच. कारण त्यांना किमान बोलण्यापुरता तरी सरकारी शाळांचे कौतुक करावेच लागते. पण स्वतःच्या मुलांना मात्र ते सरकारी शाळेत दाखल करत नाहीत. त्यासाठी महागड्या खासगी शाळांचीच निवड करतात. मात्र वर्षा मीना यांनी आपल्या मुलाला अंगणवाडीत टाकण्यासाठी सरकारी शाळेचा पर्याय निवडला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्षा मीना यांनी आपल्या पंधरा वर्षाच्या मुलाला अलीकडेच सरकारी अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सुद्धा इतरांना सरकारी शाळेतच मुलांना टाकण्याचे आवाहन केले आहे. सरकारी शाळा आणि अंगणावाडी चांगली असतात. आपण आपल्या पाल्यांना इथे पाठवले पाहिजे. अनेकांना याबाबत आवाहन केले पाहिजे. काही ठिकाणी दुरवस्था असल्याच्या घटना समोर येतात. पण त्यासाठी काम केले पाहिजे, असे त्या म्हणतात.
म्हणून सरकारी शाळेत
सरकारी शाळा, अंगणवाड्या चांगल्या नसतात, अशी सगळ्यांची मानसिकता असते. पण मला तरी तसा वैयक्तिक अनुभव आलेला नाही. मी खूप अंगणवाड्यांना भेटी दिल्या आहेत. माझं बाळ आता १५ महिन्यांचं झालं आहे. त्याला कुठेतरी अंगणवाडीमध्ये टाकलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला, असे वर्षा मीना यांनी म्हटले आहे.
हा तर अफलातून निर्णय
पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मुले इंग्रजी किंवा खाजगी संस्थांच्या शाळेत शिक्षण घेत असतात. प्रत्येक पालकाचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा हट्ट असतो. मात्र या सर्वांना अपवाद ठरत जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी स्वत: चा मुलगा अथर्व याला थेट जालन्यातील दरेगाव येथील अंगणवाडीत प्रवेश दिला. त्यांचा हा निर्णय अफलातून मानला जात आहे.