जालना – जगात कोविडचा प्रकोप कायम असताना देशातही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कठोर निर्बंधांसह लॉकाडाउन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे परिसरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. राज्याच्या इतर भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यावर लॉकडाउन लागणार का असा प्रश्न विचारला असता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.
आजपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथील महिला आणि बाल रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात करून मोहिमेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी लॉकडाउन लावण्यासंदर्भात विचारले. राजेश टोपे म्हणाले, की केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत बैठक झाली. त्यांच्यासमोर लॉकडाउनचा प्रश्न मांडण्यात आला. प्रत्येक राज्यात लॉकडाउनची व्याख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या त्या राज्यांच्या निकषांप्रमाणे लॉकडाउन लावला जातो. हरियाणामध्ये लॉकडाउन लावल्याचे कळले आहे. तर दिल्लीत लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. आयसीएमआरने सर्वच राज्यांसाठी निर्बंध आणि लॉकडाउनसाठी समान नियम लागू केला पाहिजे.
ते पुढे सांगतात, राज्यात रुग्णांनी किती खाटा व्यापल्या आणि किती खाटा उपलब्ध आहेत. म्हणजेच समजा ४० टक्क्यांपर्यंत खाटा रुग्णांनी व्यापल्या असतील आणि ऑक्सिजनचा वापर ७०० मॅट्रिक टन वाढला तर महाराष्ट्रात लॉकडाउन करावा असा निकष आम्ही ठरवला आहे. प्रत्येक राज्यात लॉकडाउन लावण्याची वेगवेगळी व्याख्या सुरू आहे. राजेश टोपे म्हणाले, की राज्यात लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. मुले लसीकरणासाठी उत्साहाने येत आहेत. त्यांची आधी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्वतंत्र नोंदणी आणि लसीकरणाची व्यवस्था केली आहे. लसीकरणानंतरच्या निरीक्षणासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देण्याची मागणी केली आहे.