जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर आज पोलिसांनी लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला आहे. या घटनेची दखल विरोधकांनी घेतली असून त्यांनी या सर्व प्रकरणाचा निषेध केला आहे. तसेच, याप्रकरणी चौकशी करुन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, या लाठीमाराचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
जिल्ह्यातील अंतरवली सराची गावामध्ये मराठा आंदोलकांनी उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षण लागू करावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, आज उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी दोघांमध्ये रेटारेटी आणि बाचाबाचीही झाली. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती चिघळली. त्याचवेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच, हवेत गोळीबारही केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात या घटनेचा निषेध केला जात आहे.
गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जणांचे उपोषण सुरू होते. या आंदोलनाला प्रतिसादही मिळत होता. त्यात आता ही मोठी घटना घडल्याने राज्यभरात त्याचा निषेध केला जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी आज अमानुष लाठीचार्ज केला. सत्तेची मस्ती आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळाली. राज्य सरकारच्या या कृतीचा मी निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बड्या बड्या बाता भारतीय जनता पक्षाने मारल्या, प्रत्यक्षात काहीच केलं नाही. आगामी काळात जनता ही सत्तेची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आजचा लाठीहल्ला हा सरकारचा क्रूरपणा आहे. या घटनेचा निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवय आरक्षण देता येणार नाही, हे माहिती असताना सुद्धा खोटे बोलवून मत घेतली.. हक्कासाठी रस्त्यावर उतरणे गुन्हा नाही. मराठा समाजाला फसवणाऱ्यांना मराठा समाज माफ करणार नाही. सरकारने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. ज्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण करून जखमी केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.