जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे अवघ्या काही दिवसांंमध्ये महाराष्ट्रात पोहोचले. आज सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा आहे. सरकारने बैठका घेतल्या आणि महत्त्वाचे निर्णयही घेतले. पण त्यानंतरही एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा आहे. आणि ती म्हणजे त्यांच्या आईची. आंदोलनादरम्यान जरांगे यांच्या आईने केलेले विधान सर्वाधिक चर्चेत आहे.
मनोज यांच्या आईने आंदोलनाला भेट दिली. या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. कारण हा अत्यंत भावनिक प्रसंग होता. मात्र त्याहीपेक्षा जास्त मनोज यांनी आईच्या पायावर डोके ठेवले तेव्हा भावनिक प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी मनोज यांच्या आईने केलेले विधान सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. ‘दहा दिवसांपासून माझा बाळ लढतो आहे, त्याने अन्न-पाणी काहीही घेतलेलं नाही. त्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या बाळासाठीच नाही सगळ्याच बाळांसाठी आरक्षण द्या अशी मागणी मी करते आहे,’ असे त्यांची आई म्हणाली. त्यावेळी मनोज आणि त्यांची आई दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.
मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. माझ्या बाळाने दहा दिवसांपासून अन्न पाणी घेतलेलं नाही त्याला न्याय द्या असं मनोज जरांगे पाटील यांच्या आई म्हणाल्या आहेत. त्यावर मनोज यांनी भावना व्यक्त केली आहे. माझीच आई नाही, प्रत्येक घरातली आई माझ्या पाठिशी आहे. यापुढे मी मराठा आरक्षणासाठी एकही मुडदा पडू देणार नाही. मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही. माझं गाव, माझं राज्य माझ्या मागे उभं राहिलं आहे मला याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे. मी माझ्या गावाच्या ऋणात आहे, असे ते म्हणाले.
मी कायमच प्रामाणिक
महाराष्ट्रातला मराठा समाजही माझ्या मागे उभा राहिला त्यामुळे मी धन्य झालो. इथे आलेल्या सगळ्या बांधवांना मी एकच सांगतो की तुमची शक्ती, तुमची ताकद ही कोट्यवधी मराठ्यांच्या पोरांच्या कल्याणासाठी वापरणार आहे. मी माझ्या समाजाशी कायमच प्रामाणिक राहिलो आहे, यापुढेही राहणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Jalna Maratha Reservation Protest Manoj Jarange Mother