जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणावर बैठका नको तर ठोस जीआर हवा, अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या चिघळलेली परिस्थिती पाहता सरकार यासंदर्भात जीआर काढणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे आमच्या लक्षात आले आहेत. आरक्षणारच्या बाबतचा निर्णय झालेला नसावा. आपण आता त्यांचे लोक येईपर्यंत वाट पाहू. अधिकृत मांडणी त्यांनीच केलेली बरी. चर्चेसाठी बैठकाचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुऱ्हाळ तेच, हे आताच्या आंदोलन करणाऱ्या पिढीला अपेक्षित नाही. चर्चेशिवाय पर्याय नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की पहिले पाढे पंचावन्न असावेत. सरकारचे शिष्टमंडळ मराठ्यांच्या विजयाचा कागद, आरक्षणाचे पत्र घेवून येईल, अशी आम्हाला अशा आहे. आम्ही सरकारच्या शिष्टमंडळाची आणि निरोपाची देवासारखी वाट पाहत आहोत. परंतु, आरक्षणाचा जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी पिणेही बंद करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा समाजातील तरूणांच्या कणाकणात ऊर्जा आहे. त्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळत आहे. आरक्षण मिळेपर्यंत आपण थांबणार नाही. आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास उद्यापासून पाणी पिणे बंद करणार असून, बुधवारी आरक्षणाची पुढील दिशा ठरविली जाईल, असेही जरांगे म्हणाले.
जीआर न आल्यास उद्यापासून पाणी पिणेही सोडणार
उपोषणस्थळी येणारे शिष्टमंडळ राज्यातील मराठा समाज बांधवाला आरक्षण दिल्याचा जीआर घेवून येईल, अशी आम्हाला आशा आहे. आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घ्यावेत. शासनाने योग्य निर्णय घेतला नसेल, आरक्षणाचा जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी पिणेही सोडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
Jalna Maratha Reservation Protest Decision after CM Meet