जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना येथे रेल्वे कोच देखभाल सुविधांका विकास (पीटलाईन)च्या कामाचे भूमीपूजन झाले आहे. जालना रेल्वे स्टेशन पूर्णपणे कायापालट केला जाणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले की नजिकच्या काळातच जालन्याचा चेहरा मोहरा विकासामुळे बदलणार आहे.
जालना येथील रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार आहे. जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर येथील गणपती मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे नवीन रेल्वे स्थानकाचे हे डिझाईन असणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे रेल्वे स्थानक राहणार आहे. यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती कारखान्यातून वंदे भारत रेल्वे बरोबरच कोचच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजूला शहर वसलेले आहे. पुढील २५ वर्षांतील शहराचे होणारे विस्तारीकरण लक्षात घेता “रुफप्लाझा” या तंत्रज्ञानाचा वापर करुन शहराच्या दोनही बाजूच्या नागरिकांना रेल्वेच्या सुविधा मिळाव्यात यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. देशभरातील ५० रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये जालना येथील स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील शहर विस्तारीकरण लक्षात घेत २०० कोटी रुपये निधी खर्चून सर्व सुविधांनीयुक्त तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने या रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये रेल्वे विकासासाठी ११ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीतून विविध कामांचे नियोजन करण्यात येत आहे. जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात येत आहेत. उद्योजकांचा माल कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचविण्यासाठी ड्रायपोर्ट प्रकल्प साकारण्यात येत आहे. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कची घोषणाही नुकतीची करण्यात आली असुन यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
देशामध्ये केवळ तीन ठिकाणीच आयसीटी महाविद्यालय असून यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश आहे. या महाविद्यालयासाठी ६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज १०० कोटी रुपयांच्या पीटलाईनचे भूमीपूजनही करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या बाजुने मुंबई ते नागपूरपर्यंत रेल्वे प्रकल्प करता येईल काय याबाबत पहाणी करण्यात येणार आहे. जालन्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच ४५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही राज्यमंत्री श्री. दानवे यांनी सांगितले.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, औरंगाबाद व जालना झपाट्याने विकसित होत असलेले जिल्हे आहेत. जनप्रवासाची रेल्वे एक लोकप्रिय वाहिनी असून रेल्वेचे जाळे संपूर्ण मराठवाडाभर अधिक प्रमाणात विस्तारावे. जालना, औरंगाबाद या ठिकाणी इलेक्टॉनिक्स उत्पादनाचे उद्योग सुरु करण्याची त्यांनी मागणी करत मराठवाड्यात उद्योग वाढवून अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, औरंगाबाद व जालना या जवळजवळ असणाऱ्या ट्विन शहरात जलदगतीने विकास होत आहे. या दोन्ही शहरांत मोठया औदयोगिक वसाहती आहेत. शिवाय जालन्यात लवकरच ड्रायपोर्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उदयोजक व नागरिकांच्या सुविधेसाठी रेल्वे कनेक्टीव्हीटीत वाढ होणे आवश्यक आहे. विशेषत: मुंबईला जाणाऱ्या ट्रेन वाढविण्यात याव्यात. शेंद्रा औदयोगिक वसाहतीत आयटीचे उदयोग येणे गरजेचे आहे. दरम्यान, जालन्याचा पालकमंत्री या नात्याने या जिल्हयाच्या विकासाचे सर्व विषय निश्चितपणे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
Jalna City and District Big Changes Coming Soon Development