विजय वाघमारे, जळगाव
जळगाव जिल्हा दूध संघात लोणी आणि दूध भुकटीची चोरी झाल्याची तक्रार १२ ऑक्टोबर रोजी दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि एमडी मनोज लिमये यांनी पोलिसांत दिली होती. परंतू पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे दुध संघाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. याबाबत आज न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे आदेश दिले असून तक्राराने ज्या शब्दात तक्रार दिली त्याच शब्दात फिर्याद घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी दिली आहे.
तक्रारीत म्हटले होते की, कोजागरी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोंबर रोजी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी प्लांटची पाहणी केली. त्यावेळी दूध भुकटी आणि लोणीसाठ्यात तफावत आढळली. तसेच वाई येथील शीतगृहातील साठ्यामध्येही तफावत होती. दरम्यान, प्रथमदर्शनी दोषी असलेले विक्री अधिकारी अनंत आंबिकर आणि महेंद्र केदार यांना निलंबित करण्यात आले आहे. साठ्यात कमी आढळून आलेले लोणी १४ मेट्रिक टन हे ७० ते ८० लाख रुपयांचे असून, ९ टन दूध भुकटीची किंमत ३० ते ३५ लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, तक्राराने ज्या शब्दात तक्रार दिली त्याच शब्दात फिर्याद घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे अपहार नव्हे तर चोरीचीच फिर्याद पोलिसांना दाखल कारवाई लागेल. तसेच न्यायालयाच्या आदेशाची प्रत काही वेळानंतर मिळणार असल्याचेही अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी सांगितले.
दुसरीकडे जिल्हा दूध संघातील कथित चोरी आणि अपहाराच्या आलेल्या तक्रारींचा प्राथमिक अभ्यास करून पोलिसांकडून रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. शहर पोलीस स्थानकाचे सपोनि संदीप परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबत एकनाथराव खडसे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले की, न्यायालयाचे आदेशाने एकप्रकारे आमची तक्रार खरी होती, असे सिद्ध होत आहे. त्यामुळेच आम्ही दिली तशीच तक्रार पोलिसांनी नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत. दुध संघात अपहार नव्हे तर चोरीच झाली आहे. पोलीस तपासात आता सत्य बाहेर येईलच. परंतू जळगाव पोलीस सरकारच्या दबावात काम करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.