जळगाव – मुक्ताईनगर साखर कारखान्याला वितरीत केलेल्या कर्ज बाबतची माहितीसाठी ईडीने रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या जिल्हा बँकेला मंगळवारी पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी जानेवारी २०२० मध्ये पत्रकार परिषद घेत कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे ? हे सर्व कर्ज बेकादेशीर आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकारमंत्र्यांकडे आपण तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.
पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडी चौकशी झाली असून त्यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलैपासून ईडीच्या अटकेत आहेत. यानंतर खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांची देखील चौकशी अजून बाकी आहे. दरम्यान, आता एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या अध्यक्षा असणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीने मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या कर्जची सर्व माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे. या पत्रात कर्ज कधी मंजूर झाले?, कर्जाची आता स्थिती काय आहे? तसेच कशाच्या आधारावर हे कर्ज देण्यात आले, यासह इतर माहिती मागवली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हा बँकेने कर्ज मंजुरीशी संबंधित सर्व कागदपत्रांसह इतर माहिती ईडी कार्यालयात पुढील आठ-दहा दिवसात दिली जाणार असल्याचे कळतेय.
दरम्यान, जळगावच्या जानेवारी २०२० मध्ये पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील म्हणाले होते की, जिल्हा बॅंकेत एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन आहेत. तर संत मुक्ताई साखर कारखाना एकनाथराव खडसे व शिवाजी जाधव यांनी ४९ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळे त्याला ५१ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. त्यानंतर ५५ कोटी रुपये माल तारण कर्ज देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आणखी आठ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. आताही पुन्हा ८१९६ लाखांच्या कर्जासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. १० जानेवारी २०२० होणाऱ्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. खासगी कारखान्याला एवढे कर्ज कसे मंजूर केले जात आहे?. मधुकर सहकारी कारखान्याला हमी दिली जात नाही. शेतकऱ्यांनाही कर्ज दिले जात नाही. परंतु या कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे? हे सर्व कर्ज बेकादेशीर आहे. यासंदर्भात आपण मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे व सहकारमंत्र्यांकडे आपण तक्रार दाखल करू,असे आमदार पाटील म्हणाले होते.