जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील रायपूर- कुसुंबा येथील परप्रांतीय गृहस्थाचे घरून अपहरण करून नेत मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) नेऊन त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाहीतर हत्येनंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या गंभीर घटनेचा ५३ दिवसांनी उलगडा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण जयराम तळेले (वय ३०) बऱ्हाणपूर येथील भातखेडा, पानगर येथील रहिवासी. एमआयडीसीतील चटई कंपनीत ते कामासाठी होते. पत्नी व कुटुंबासह जळगाव तालुक्यातील रायपूर (कंडारी) येथे स्थलांतरित झाले. १७ एप्रिलला भूषण तळेले नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, आतापर्यंत घरी परतलेच नाहीत. दोन महिन्यांपर्यंत त्यांची प्रतीक्षा केली. शोध घेत, नातेवाइकांकडे चौकशी केल्यावरही त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने भूषण तळेले यांची पत्नी आशा तळेले यांनी २० एप्रिलला एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आशा तळेले यांच्या तक्रारीत काहीतरी कारणावरून किंवा आर्थिक देवाण-घेवाणीतून पती भूषण तळेले यांना रायपूर येथील भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी अपहरण केल्याचे नमूद आहे. त्यावरून विठ्ठल परदेशी व भिकन परदेशी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अपहरणानंतर खून
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनिस शेख, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांनी विठ्ठल परदेशी व भिकन परदेशी यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात पाहुणचार केला. नंतर संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. भूषण तळेलेचे अपहरण करून मध्य प्रदेशात एका ठिकाणी त्यास डांबून ठेवले. नंतर त्याची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरून टाकल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पोलिसही चक्रावले. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश सोनवणे यांनी ११ जूनपर्यंत कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
५३ दिवसांनी उलगडा
१७ एप्रिलला भूषण तळेले याचे अपहरण झाले. २० एप्रिलला आशा तळेले यांनी पती हरविल्याची तक्रार दिली. अपरहणानंतर अनोळखी क्रमांकावरून आशा तळेले यांना फोन करून पती सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर पावणेतीन महिने अर्थात तब्बल ५३ दिवस उलटूनही तपास लागत नसल्याने संशय बळावला. भूषण तळेले यास सेाबत नेणाऱ्या दोघांना चौकशीअंती ताब्यात घेतल्यावर या गंभीर घटनेचा उलगडा झाला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.