विजय वाघमारे, जळगाव
शहरातील कोल्हे शाळेजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकाला चाकू मारून चोरट्यांनी तब्बल चार कोटींचा ऐवज लुटून नेला होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात गुन्ह्याची उकल करत तीन आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. पोलिसात तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक म्हणजे तिघांपैकी एक आरोपी हा पोलीस अधिकारी आहे. तसेच या गुन्ह्यात त्याच्या वडिलांसह बँक कर्मचारी असलेला शालक देखील आरोपी निघालाय.
असा पडला दरोडा
बँक व्यवस्थापक राहुल मधुकर महाजन (रा.एम.जे कॉलेजसमोर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि. १ जून रोजी ते नेहमी प्रमाणे सकाळी ९.४५ वाजता बँकेत गेले. तेव्हा बँकेचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोकल्या नंतर दरवाजा कोणीतरी उघडला. आत गेल्यानंतर दोन काळे हेल्मेटधारी तसेच काळ्या रंगाचे शर्ट घातलेले इसमांनी दरवाजा मागून येत राहुल महाजन यांना पकडून वॉशरूमकडे मारहाण करीत घेऊन गेले. त्याठिकाणी कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक हे बसलेले होते. त्यांच्या तोंडाळा चिगट पट्ट्या बांधलेल्या होत्या. त्यांच्या जवळच हाऊस कीपिंग मनोज सुर्यवंशी व सिक्युरीटी गार्ड यांना देखील तोंडावर चिगटपट्टी बांधून बसवून ठेवलेले होते.
असा दाखवला धाक
अज्ञात दरोडेखोरांनी व्यवस्थापक महाजन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाबी-चाबी असे बोलून मारहाण करायला लागले. त्यांनी बॅगेत चावी आहे, असे सांगितले तेव्हा महाजन यांनी बॅगेतून चाबी काढून दरोडेखोरांना दिली. त्यानंतर दोघं दरोडेखोर महाजन यांना कॅश रूमकडे घेवुन गेले. त्या ठिकाणी त्यांनी मनोज सुर्यवंशी यास कॅश रुमकडे आणले. त्यांनी मनोजला चाकूच्या धाक दाखविला. त्यामुळे मनोजने त्यांना कॅश रूम उघडुन दिली. यावेळी महाजन यांनी दोघां दरोडेखोरांपैकी एकाशी झटापटी केली. त्यावेळी त्यांचे डोक्यातील हेल्मेट खाली पडले आणि घडताच त्याने महाजन यांच्या मांडीवर चाकूने वार केले. यावेळी महाजन यांनी मनोजला ओरडून सांगितले की, याला पकड़ याला पकड पण त्याने पकडले नाही. दरोडेखोराने तिजोरीमधून रोकड काढली आणि त्यांने व्यवस्थापक महाजन यांना मारहाण करुन पोटावर चाकू लावत गोल्ड तिजोरी देखील उघडायला लावली.
अवघ्या काही मिनिटात
दरोडेखोराने गोल्ड तिजोरीमधील सर्व खाते उघडे करण्यास लावत. त्यातील सर्व गोल्ड बॅग काढून घेतल्या. यावेळी त्याचा दुसरा साथिदार सुध्दा त्या रूममध्ये आला आणि त्या दोघांनी काळी बॅगमध्ये कॅश व सोने टाकले. यानंतर दरोडेखोरांपैकी एका जाड इसमाने व्यवस्थापक महाजन यांना इशारा करून त्यांच्या मोटार सायकलची चाबी चाकू लावून बळजबरीने हिसकावून घेतली. तर मनोजला वॉशरूमकडे पाठवून महाजन यांना कॅश रूममध्ये भिंतीकडे तोंड करायला लावुन बसवुन ठेवले. यानंतर कॅश रुम बाहेरुन लावून निघून गेले. संपूर्ण चौकशी अंती दरोडेखोरांनी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये आणि ३ ते ४ कोटी रुपयाचे सोने लुटून पोबारा केला. दरोडेरांचा बँकेत घुसल्यापासून तर रोख रक्कम, दागिने पळवून नेण्यापर्यंतचा थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यामुळे अगदी सगळं ठरल्यागत हा फिल्मी स्टाईल दरोड्याचा थरार घडल्यामुळे पोलिसांनी त्याच दृष्टीने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली होती.
…म्हणून बळावला बँक कर्मचाऱ्यावर संशय !
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, परिरक्षावधीन उप विभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी, परि उप विभागीय पोलीस अधिकारी, आप्पासाहेब पवार, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांनी बँकेतील कर्मचारी व बँक मॅनेजर (फिर्यादी) यांना वेगवेगळी विचारपूस केली असता बँकेतील स्टाफ तसेच फिर्यादी व मनोज सुर्यवंशी याचे हकिगतमध्ये तफावत आढळल्याने मनोज सुर्यवंशी याच्यावर संशय वाढला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्हा माझा पाहुणा शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक असे आम्ही मिळून केला असून जबरी चोरीतील नेलेले सोन्याचे दागीने व पैसे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत येथे घेवून गेले असल्याची माहिती पोलिसांना दिली. दुसरीकडे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने सर्व सीसीटिव्ही फुटेज आणि धागेदोरे तपासले. त्यातून चोरट्यांचा मार्ग समजून आला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुसुंबा बसस्थानकजवळ मिळून आली तर बँकेचे डीव्हीआर, हेल्मेट, कर्मचाऱ्यांचे मोबाईल एमआयडीसी परिसरातील एक नाल्यात मिळून आले होते.
पोलिसांचे पथक कर्जतच्या दिशेने रवाना !
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी वेगवेगळे ३ पोलीस पथक तयार करून पथकात परिरक्षवधीन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांचे सोबत स्थानिक गुन्हे शाखा व शनिपेठ पो.स्टे. कडील पोलीस अमंलदार यांचे पथक तयार करून कर्जत येथे पाठवले.
पथकालाही बसला धक्का !
पथकाने शंकर जासक याच्या मिळालेल्या पत्यावर शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता, तो पोलीस उप निरीक्षक पदावर रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर २०२१ पासुन कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजुन आले. त्याने त्याचा शालक मनोज सुर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ इंडीया कालका माता जळगाव येथे ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस असल्याने त्याच्यासोबत संगनमत करून शंकर रमेश जासक, त्याचे वडील रमेश राजाराम जासक (वय-६७) व शालक मनोज रमेश सुर्यवंशी अश्यांनी केला असून त्याने बँकेतून नेलेले सोने व रोकड देखील काढून दिली.
कोट्यावधींचे दागिने आणि लाखोंची रोकड
पोलीस पथकाने शंकर जासक याच्याकडून चोरीतील ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजारांची रोकड हस्तगत केली आहे. उर्वरित ७० हजार रुपये हस्तगत करणे अद्याप बाकी आहे. शंकर जासक याच्यावर अगोदर निलंबनाची कारवाई झाली असून गेल्या वर्षभरापासून तो वैद्यकीय रजेवर आहे. पोलीस महासंचालकांनी रायगड पोलीस अधीक्षकांना शंकर जासाक याला बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची सूचना केली आहे. शंकर जासक याचे वडील जळगावपासून जवळच असलेल्या मन्यारखेडा येथील रहिवासी आहेत. पोलीस प्रशासनाकडून तपास पथकाला बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे.
Jalgaon State Bank Robbery Police Investigation