जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील यावल येथील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजी पंडित पाटील (वय ४८, रा. बारीपाडा, यावल) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल आघारात ते गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी खिशात चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीतूनच त्यांच्या आत्महत्येचा खुलासा झाला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे. आर्थिक परिस्थिती आणि मनस्थिती खराब असल्याने मी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. तसेच, माझ्या आत्महत्येचा परिवाराशी काहीही संबंध नाही, असे चिठ्ठीत त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हिरकणीबाई, मुलगा हेमंत, मुलगी उत्तेषा, आई आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या आत्महत्येमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.