जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्याला मोठे खिंडार पडले आहे. कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेची तोफ अशी ओळख असलेले गुलाबराव पाटील हे आता नॉट रिचेबल झाले आहेत. ते सुद्धा बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी होणार का, अशी अटकळ बांधली जात आहे. तर, अन्य चार आमदारही शिंदेंना सामील झाल्याचे बोलले जात आहे.
मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला पाहण्यासाठी रात्रीत मुक्ताईनगरात आले होते. मात्र अचानक चंद्रकांत पाटील यांना फोन आल्यानंतर ते तातडीने गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आमदार पाटील हे देखील आता नॉट रिचेबल झाले आहेत. म्हणजेच सेनेचा शेवटचा आमदारही फुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणूक आटोपताच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३० पेक्षा अधिक आमदारांचा फोटो आणि व्हिडीओ आज सकाळी व्हायरल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार त्यात असल्याचे स्पष्ट झाले होते.
आज पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल झाल्याचे वृत्तसमोर आलं आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत काल दिसून आलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आता नॉट रिचेबल येत आहे. जळगावातील सेनेची चारही आमदार फुटल्याचे निश्चित झाल्यानंतर शेवटचे आमदार देखील फुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका वृत्तानुसार आ.चंद्रकांत पाटील गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत असून दुसरीकडे त्यांना ना.एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचे देखील म्हटले जात आहे. आ. पाटील यांच्या मोठ्या नगर येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे पक्षातील तब्बल ४६ आमदार फोडून वेगळा ‘संसार’ मांडण्याच्या तयारीत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकार वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. बुधवारी सकाळपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी गुप्तचर यंत्रणेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय चित्र पाहायला मिळतं हे पुढचा काळच सांगेन.
jalgaon shivsena mla political crisis ministers