मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे परधाडे रेल्वे स्टेशननजीक रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीने ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धूर आल्याने आगीची अफवा पसरुन प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुस-या दिशेने येणा-या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याची घटना घडली. या अपघातात ११ हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.
जिल्हा प्रशासन अलर्टवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती*
जळगाव – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य सुरू आहे.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पालकमंत्र्याकडून घटनास्थळीचा आढावा
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले, “मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.” घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकार व रेल्वे विभागाच्या संपर्कात जिल्हा प्रशासन
घटनेच्या अनुषंगाने रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मदतकार्य जलदगतीने सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
रेल्वे दुर्घटनास्थळी पोहचून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हाताळली परिस्थिती*
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहचून परिस्थिती हाताळली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटना स्थळी थांबून होते. मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून. जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटल मध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.