जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खानदेशातील मातब्बर नेते असलेले राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्यातील भांडण मिटल्याचा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही परस्परविरोधी पक्षातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये असलेला वाद संपल्याने राजकीय क्षेत्रात नव्या समीकरणांचीदेखील चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ खडसे हे मंत्री असताना २०१६ मध्ये त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यात तारखेवर एकदा मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेवर एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंडसुद्धा केला होता. या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात आज सुनावणी पार पडली.
यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली असून दोघांच्या गैरसमजतेतून हा दावा दाखल झाला होता. याबाबत दोघांनी न्यायालयात लेखी दिले आहे. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आला असल्याची पहिली प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
सोबत चहा घ्यायला हरकत नाही
दोघांमधील वाद संपल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आता त्यांच्यासोबत चहा घ्यायला हरकत नाही आमची काही दुश्मनी नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.