जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील तीन महत्त्वाचे नेते असलेल्या एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. निमित्त होते ते जळगाव जिल्हा नियोजन मंडळ बैठकीचे. विकासकामांवरुन या तिन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे बैठकीत चांगलेच वातावरण तापल्याचे पहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे वाद संपूर्ण जिल्ह्याला परीचित आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना देखील गिरीश महाजन आणि खडसे यांच्यामध्ये वाद होत असत. आता खडसे भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये गेले, तरीही हे वाद मिटण्याऐवजी आणखीनच वाढले आहेत. दोघी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. किंबहुना ते एकमेकांचे राजकीय शत्रूच आहेत, असे देखील म्हटले जाते. दोघे नेहमीच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतात.
काही दिवसांपूर्वीच घराणेशाहीच्या कारणावरून किंवा प्रश्नावरून दोघांमध्ये वाद झाला होता, तर आता चक्क एका बैठकीत ते दोघे एकत्र आल्याने पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप झाले, विशेष म्हणजे ही बैठक दोघांचे कार्यक्षेत्र तथा जिल्हा असलेल्या जळगाव जिल्हा नियोजन मंडळाचे बैठक होती. आता त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्हा दूध संघावरुन हे वाद घराणेशाहीवर आले होते. एकनाथ खडसे घराणेशाही करतात, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. त्याला एकनाथ खडसे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
तर आता नियोजन मंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केल्यावर मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तसेच या विषयावरुन सभागृहात मात्र काही वेळासाठी वातावरण चांगलेच तापले होते. शिंदे सरकारला काळातील जळगाव जिल्हा नियोजन समितीचे आज सोमवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पहिली बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते.
सभागृहात अधिकाऱ्यांनी औषधीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबाबतचा प्रश्न मांडला.
यावर एकनाथ खडसे जिल्हा नियोजन समितीतून औषधींसाठी निधी खर्च करण्याची गरजच काय? वैद्यकीय शिक्षण विभागातून औषधींसाठी निधी का वापरले नाहीत? या औषधींचा खर्च का करु नये? असे अनेक प्रश्न उपस्थित करत खडसेंनी सभागृहातील अधिकाऱ्यांना तसेच मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले. त्यानंतर याच मुद्द्यावरुन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात तू तू मैं मैं झाली. तुमच्या घरातून कुठे पैसे जात आहेत, असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले अखेर गिरीश महाजन यांनी कशा पद्धतीने औषधींसाठी पैसे खर्च करतात याची माहिती दिली. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत या विषयात मार्ग काढण्यात येईल असे सांगितले.
वास्तविक विषय या सभागृहापुरता जरी थांबला असला तरी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील प्रत्यक्षातील ही खडाजंगी आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली. सध्या जळगावचे राजकारण दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलेच तापले आहे. अनेक वर्षांपासून जळगाव दूध संघ खडसे समर्थकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आला आहे. यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
Jalgaon Politics Eknath Khadse Girish Mahajan Gulabrao Patil
District Planning