पाचोरा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) भल्या पहाटे उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली. तसेच, पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राजू राठोड (वय १९) आणि साक्षी सोमनाथ भोई (वय १८) असे मृत प्रेमी युगलाचे नाव आहे. जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावून घेतला. आज पहाटे या दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय वसावे, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल झाले.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली? तसेच इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पीएसआय वसावे यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे पाचोरा तालुका मात्र, हादरून गेला आहे.
साक्षी हिचे दोन दिवसांपूर्वीच शिंदखेडा येथे लग्न झाले. त्यानंतर साक्षी ही रविवारी माहेरी आली होती. तिची आणि जितेंद्रची भेट झाली. त्यानंतर दोघांनीही आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.