जळगाव – घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील अँड प्रवीण चव्हाण यांचा प्रभावी युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. यासंदर्भात अधिक असे की, आगामी काळात निवडणूक लढवता यावी, यासाठी घरकुल घोटाळ्यात आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती आहुजा यांच्या खंडपीठासमोर आमदार सोनवणे यांच्या याचिकेवर सुनवाई झाली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेला जोरदार विरोध केला. माजी आमदार सोनवणे हे या घोटाळ्याच्या कटातील प्रमुख आरोपीपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येऊ नये, असा प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर खंडपीठाने आज माजी आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली. दरम्यान, माजी आमदार सोनवणे हे जळगाव जिल्हा बँकेत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्यासाठीच त्यांनी ही याचिका दाखल केली होती, असे कळते. दरम्यान मुंबई कोर्टात याचिका फेटाळण्यात आली असली तरी, आपण सुप्रीम कोर्टात याबाबत दाद मागणार असल्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.