इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावमधील जैन हिल्स येथील नयनरम्य अनुभूती मंडपामध्ये 11 वर्षांखालील 38 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. नवोदित खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले.
दिव्या देशमुखने अलिकडेच फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाप्रमाणे हा उद्घाटन समारंभ भारतातील युवा बुद्धिबळ खेळाडूंच्या अफाट क्षमतेचा दाखला होता.
आपल्या मुख्य भाषणात रक्षा खडसे यांनी लहान वयात मिळणाऱ्या संधींच्या महत्त्वावर भर देत ते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या तळागाळात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनासोबत जुळणारे असल्याचे नमूद केले . त्यांनी ‘खेलो भारत नीती 2025’ आणि ‘खेलो इंडिया’ सारख्या प्रमुख उपक्रमांद्वारे युवा खेळाडूंना सक्षम करण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. हे उपक्रम भविष्यातील क्रीडा विजेत्यांना घडवण्यासाठी क्रीडा प्रतिभांना प्रोत्साहन देण्याचं, तंदुरुस्ती वाढवण्याचं आणि आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचं काम करतात, असे त्या म्हणाल्या. खडसे यांनी तरुण खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की बुद्धिबळामुळे शिस्त आणि तल्लख बुद्धिमत्ता यांसारखे महत्त्वाचे गुण विकसित होतात, जे क्रीडा आणि जीवन या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांच्या भविष्यातील यशाचा पाया घालतात. या स्पर्धेने देशभरातील 550 पेक्षा जास्त बुद्धिबळपटूंना आकर्षित केले आहे. यातील जवळपास 400 खेळाडूंकडे फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघ) मानांकन असून त्यातून या स्पर्धेची उच्च गुणवत्ता दिसून येत आहे.
अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब आणि राजस्थान यासारख्या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारी ही युवा प्रतिभा राष्ट्रीय ओळख आणि आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी जळगावमध्ये एकत्र आली आहे.
ही अजिंक्यपद स्पर्धा स्विस लीग प्रारूपनुसार 11 स्पर्धात्मक फेऱ्यांमध्ये आयोजित केली जात आहे, ज्यामुळे सहभागींना त्यांचे फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळते. उल्लेखनीय स्पर्धकांमध्ये पुण्यातील अद्विक अग्रवाल (फिडे मानांकन: 2251) आणि केरळमधील देवी बिजेश (फिडे मानांकन: 1869) यांचा समावेश आहे, ज्यांचा सहभाग या स्पर्धेचे वेगळेपण वाढवतो.
ही स्पर्धा जैन इरिगेशनच्या प्राथमिक प्रायोजकत्वाखाली जैन क्रीडा अकादमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे.
एकूण ₹8 लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये विजेते आणि उपविजेते यांच्याव्यतिरिक्त प्रशंसनीय ड्रॉ आणि कौशल्य, खिलाडूवृत्ती आणि धोरणात्मक कामगिरी यासाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
ही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जळगावच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय बुद्धिबळपटूंच्या उदयोन्मुख पिढीसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासह बुद्धिबळ खेळातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यामधील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्र आपले स्थान अधिक भक्कम करत आहे.