जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) :राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील १७.७० किलोमीटर लांबीच्या पाळधी–तरसोद बायपास रस्त्याचे सर्व प्राथमिक बांधकाम पूर्ण झाले असून कोणतेही काम अपूर्ण राहिलेले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आता गुणवत्ता चाचणी, शील कोटिंग, साईन बोर्ड, लाईटिंग व रस्ता टेस्टिंग ही अंतिम टप्प्यातील कामे नियोजित वेळेत पार पडणार आहेत.
संयुक्त पाहणी करत थेट तरसोद पर्यंत प्रवास
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि राष्ट्रीय महामार्गाचे सल्लागार चित्ररंजन खेतान यांनी आज या बायपास मार्गाची संयुक्त पाहणी केली. पाळधीपासून नव्याने बांधलेल्या तरसोद पुलापर्यंत गाडीने प्रत्यक्ष प्रवास करत संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली.
“प्राथमिक काम पूर्ण, आता गुणवत्ता परीक्षण” – जिल्हाधिकारी
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “या बायपास मार्गाचे प्राथमिक सर्व घटक पूर्ण झाले आहेत. उर्वरित अंतिम कामांनंतर गुणवत्ता परीक्षण होईल. त्यानंतर रीतसर उद्घाटन करून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.”
पालकमंत्री व खासदारांच्या हस्तक्षेपानंतर कामाला गती
या मार्गाची काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी करून त्वरित गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर चार दिवसांपूर्वी खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी देखील पाहणी करत काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. प्रशासनाने त्या सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वाहतूक सुरू होईपर्यंत नागरिकांनी वापर टाळावा – प्रशासनाचा इशारा
दरम्यान, काही नागरिक रेसिंग व रील्ससाठी नव्याने बांधलेल्या रस्त्याचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. “गुणवत्ता चाचणी पूर्ण होईपर्यंत हा मार्ग अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला नाही. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गाचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिला.
वाहतूक कोंडी व प्रदूषणात होणार लक्षणीय घट
या बायपासच्या माध्यमातून पाळधी–तरसोद दरम्यानची वाहतूक शहराबाहेर वळवता येणार असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी व प्रदूषणात लक्षणीय घट होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.