जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगावमध्ये गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता, की ॲम्बुलन्स २० फूट दूर जाऊन पडली. चालकाच्या समयसूचकतेमुळे गरोदर महिला आणि डॉक्टराचा जीव वाचला. चालकाने वेळीच दोघांनाही खाली उतरवले.
जळगाव शहरातील मुंबई-नागपूर महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. चालकाच्या समयसूचकतेमुळे ॲम्बुलन्समधील रुग्ण, नातेवाइक, डॉक्टरांचा जीव वाचला. स्फोट इतका भयंकर होता, की ॲम्बुलन्सच्या चिंधड्या झाल्या. वाहानाचे अवशेष हवेत उंच उडाले होते. आवाजाने आजूबाजूचे लोकही थोडावेळ घाबरले. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले.
ऑस्किजन सिलिंडरचा स्फोट बुधवारी रात्री दहा वाजताच्या आसपास झाला. हा स्फोट इतका भयानक होता, की ॲम्बुलन्स वीस फूट दूर जाऊन पडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. ॲम्बुलन्सला अगोदर अचानक आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गियर बदलत असताना गाडीत आगीची ठिणगी उडाली. चालक राहूल बाविस्कर याला काही तरी गडबड असल्याचा अंदाज आला. त्याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाइकांना दुसऱ्या वाहनाने पाठवले. हे वाहन जाताच अॅम्बुलन्समध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता, की आजूबाजूच्या वाहनांनादेखील मोठा हादरा बसला. आग लागल्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासभरानंतर आग आटोक्यात आली