जळगाव – येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तुरुंगातील आठवणी ताज्या केल्या. यावेळी त्यांनी आपला जीव कसा वाचला याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, तुरुंगात असतांना एकदा फार गंभीर प्रकृती झाली होती. त्यावेळेस कपिल पाटील विधीमंडळात उभे राहिले. त्यांनी तुम्ही काय वागणूक देत आहात, हॅास्पिटलमध्ये नेत नाही, नीट काळजी घेत नाही, तिथे मारुन टाकणार की काय ? असे प्रश्न विचारले. त्यानंतर शरद पवारांनी थेट सरकारला पत्रच पाठवले त्यात भुजबळांना काय झाले तर सरकार जबाबदार राहील, सुदैवाने मी बाहेर आलो. यावेळी मेळाव्यात त्यांनी मला ज्यांनी त्रास दिला त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात होईल असेही विधान केले.
जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी,माजी मंत्री डॉ. सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील,रोहिणी खडसे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ,संतोष चौधरी, किशोर पाटील, कैलास पाटील, अभिषेक पाटील, कल्पना पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भुजबळांनी या मेळाव्यात ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करा. पक्षाचे नेते पवार साहेब हे आजही अतिशय तत्परतेने काम करतात. त्यांच्याकडे पाहून सर्वांना काम करण्याची प्रेरणा मिळते. ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असून सर्वांना सोबत घेऊन ते काम करताय त्याच पद्धतीने आपल्या सर्वांना वाटचाल करावयाची आहे असे मतही व्यक्त केले.
यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील नेते कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यांचे भुजबळ यांनी पक्षात स्वागत केले आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्मानाने वागणूक मिळेल त्यांना बोलण्याची आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल असे आश्वस्त केले. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठावाडा विद्यापीठाला देण्यास शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. शरद पवार साहेबांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारावर चालत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
ओबीसी आरक्षणावर बोलताना भुजबळ म्हणाले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी सरकार कडून अध्यादेश काढण्यात आला आहे. पाच जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अध्यादेशाप्रमाणे ओबीसी आरक्षण लागू व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे.ओबीसींची जनगणना करण्यात यावी यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत आवाज उठवीत सर्वांना एकत्र केले. त्यासाठी पवार साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जनगणना होऊनही अद्यापही जनगणना जाहीर केली जात नाही आहे. मात्र त्यासाठी आपला लढा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायचे आहे हा लढा आपण सर्वांनी मिळून लढू.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री भुजबळ म्हणाले की जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार निवडून येतील यासाठी कामाला लागा. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर आपण काम करत असून शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.कोरोनाच्या काळात सर्वाधिक खर्च शासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेवर करण्यात येत आहे. किंतु परंतु मनातून काढून टाकावे सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.