इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काठमांडू – नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणा-या बसला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात १४ जण ठार झाले असून १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. बस पोखराहून काठमांडूला जात होती. घटनास्थळी नेपाळ लष्कराकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली असून त्यात नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो. प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.
सकाळी साडेअकरा वाजता अपघात
यूपी एफटी ७६२३ नंबर असलेल्या ही पोखराहून काठमांडूकडे निघाली होती. त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत सकाळी साडेअकरा वाजता कोसळली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. नेपाळ पोलिसमधील डीएसपी दीपकुमार राय यांनी या घटनेची माहिती देतांना सांगिले की, बस नदीत कोसळली असून ती नदीच्या किना-यावर पडली आहे. स्थानिक पोलिस व बचाव दल घटनास्थळी पोहचले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.