विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – न्यायालयाच्या बाहेरच दोघांवर गोळीबार करून त्यांचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गोळीबार करण्यापूर्वीच पोलिसांनी शिताफीने एकाला अटक केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोहर आत्माराम सुरळकर (४६, रा. भुसावळ) असे अटक केलेल्याचे तर सुरेश रवी इंधाटे (रा. भुसावळ) असे फरार संशयिताचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे बुरखा परिधान करुन खून करण्याचे दोघांचे नियोजन होते.
या संदर्भात अधिक असे की, लहान मुलांच्या भांडणातून दोन वर्षापूर्वी भुसावळातील पंचशील नगरामध्ये कैफ शेख जाकीर या तरूणाचा खून झाला होता. या गुन्ह्यात धम्मप्रिय मनोहर सुरळकर (१८) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सप्टेंबर-२०२१ मध्ये धम्मप्रिया याची जामिनावर मुक्तता झाल्यावर मनोहर सुरळकर व धम्मप्रिया हे पिता-पुत्र घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ सिगारेट घेण्यासाठी थांबले. तेव्हा धम्मप्रिया याच्यावद दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला तर त्याच्या वडीलांवर चाकूने सपासप वार केले. या गोळीबारात धम्मप्रिय यांचा मृत्यू झाला होता. नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेख शमीर उर्फ समीर शेख जाकीर आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन यांना अटक केली होती.
वर्षभरापूर्वी झालेल्या मुलाच्या खुनातील संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात पोलिस हजर करणार होते. डोळ्या देखत मुलाचा खून केल्यानंतर ‘खुनाचा बदला खून’ म्हणून बापानेही खून करण्याचा कट रचला. त्यानुसार आज न्यालायातून बाहेर पडल्यावर गोळीबार करून खून करण्याचा ठरले. परंतु दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसाने तत्परता दाखवत बापाचा हा कट उधळून लावला. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नातील बापाला पोलिसांनी पकडले. मात्र त्याचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व पाच जीवंत काडतूस जप्त केले आहे.