जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर झालेल्या दगडफेकीत विजयी उमेदवाराच्या भावाचा मृत्यू झाला. धनराज श्रीराम माळी असे मृत झालेल्याचे नाव आहे. या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर विजयी व पराभूत असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत दगडफेक करणा-या २५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. या घटनेने गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी यांचा विजय झाला. विजयी झाल्यानंतर ते गावातील देवीच्या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी जात असतांना पराभूत पॅनलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात काही जणांनी लाठ्या काठ्या हल्ला केला. या हल्ल्यात धनराज माळी यांच्या डोक्यात दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पण, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.