जळगाव – धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील व्यापारी व त्याच्या भागीदार कंपनीची करोडो रुपयात फसवणूक झाली आहे. व्यापा-यांना करोडो रुपयांचा गंडा घालणारी मनमाडची चौकडीला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. राहुल कांतीलाल लुणावत, सुमित राजेंद्र लुणावत, शुभम राजेंद्र लुणावत या सर्वांचा म्होरक्या दिनेश उर्फ योगेश कांतीलील लुणावत असे गंडा घालणारी मनमाडची चौकडीचे नावे आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, प्रतिक राजेश भाटीया या तरुण उद्योजकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा धरणगाव येथे आरव्हीसी कॉटन फर्म या नावाने व्यवसाय आहे. १२ डिसेंबर २०१९ ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत प्रतिक राजेश भाटीया यांच्या पिंप्री ता. धरणगाव येथील जोगेश्वरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथून मनमाड येथील चौघांनी मिळून ३ कोटी ७५ लाख ५२ हजार १६६ रुपये किमतीचे धान्य खरेदी केले आहे. सदर धान्य प्रतिक राजेश भाटीया यांनी चौघांना विश्वासावर क्रेडीट बिलासह दिले. त्यात निल ट्रेडर्सचे प्रोप्रायटर राहुल कांतीलाल लुणावत यांनी ६० लाख २९ हजार ७०२ रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. सुमीत एजन्सीचे प्रोप्रायटर सुमित राजेंद्र लुणावत यांनी १ कोटी ८१ लाख २६ हजार ८९४ रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. शुभम ट्रेडींगचे प्रोप्रायटर शुभम राजेंद्र लुणावत यांनी १ कोटी ३३ लाख ९५ हजार ५७० रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. या सर्वांचा म्होरक्या दिनेश उर्फ योगेश कांतीलील लुणावत हा आहे. या चांडाळ चौकडीने एकुण १ कोटी ३३ लाख ९५ हजार ५७० रुपयांमधे प्रतिक राजेश भाटीया व त्याच्या भागीदार कंपनीची फसवणूक केली आहे. सदर गुन्हा धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती बघता या चांडाळ चौकडीने चोपडा येथील एका व्यापा-याला सुमारे २ कोटी तर दुस-या एका व्यापा-याला ३२ लाख रुपयाला फसवले. त्याचप्रमाणे पाळधी येथील एका व्यापा-याला ३६ लाख तर जळगाव येथील विविध व्यापा-यांना जवळपास ८ कोटी रुपयांमधे फसवल्याची चर्चा आहे. याशिवाय राज्यातील विविध व्यापा-यांची देखील अटकेतील आरोपींनी करोडो रुपयात फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात अटकेतील चौघांची पोलिस कोठडी १६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.