विजय वाघमारे, जळगाव
फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी चॅटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात दोघांनी विधिवत लग्न केले. परंतू एकेदिवशी नवरदेवाच्या मनात आपल्या पत्नीबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबियांनी नववधूला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर नववधूचे बिंग फुटलं आणि सर्वांना जबर धक्का बसला. कारण नववधू स्त्री नव्हे तर चक्क तृतीयपंथी होता. या संदर्भात न्यायालयात दाद मागितल्यानंतर फसवणूक आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह (रा. भुसावळ), असे फसवणूक करणाऱ्या तृतीयपंथीचे नाव आहे.
फेसबुकवर झाली दोघांची ओळख !
या संदर्भात अधिक असे की, संजय (वय २७, नाव बदलेले) या तरुणास १४ एप्रिल २०२३ रोजी फेसबुकवर दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. थोड्याच दिवसात दोघांनी एकमेकांशी केलेल्या चॅटिंगचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर लागलीच १५ दिवसांनी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दोघांनी लग्न विधीवत लग्न केले.
नववधू महिले सारखी वागत नसल्याने शंकेची पाल चुकचुकली !
लग्नानंतर काही दिवसांत आपली पत्नी ही नववधू सारखी वागत नव्हती. त्याला स्पर्श देखील करू देत नव्हती. त्यामुळे संजयने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनाही दिव्याला डॉक्टरांकडे नेत वैद्यकीय चाचणी केली. यात दिव्या ही स्त्री नसून तिला गर्भधारणा होऊ शकत नाही, असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला. यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत दिव्याला विचारणा केल्यावर तिने संजयच्या कुटुंबियांकडे तब्बल १० लाखांची मागणी केली.
न्यायालयात मागितली दाद !
अखेर संजय याने न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले. त्यानुसार न्यायाधिश आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात सुनावणीअंती न्यायालयाने हा निकाल दिला. यात दिव्या ही महिला नसून दिव्या उर्फ रोहित मनिष मशीह याच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. शुभमतर्फे अॅड. केदार भुसारी यांनी काम पाहिले. दरम्यान, दिव्या उर्फ रोहित याने चार जणांना अशाच प्रकारे लुबाडले असल्याचे अँड. भुसारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.