जळगाव – जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या २९ बंडखोर नगरसेवकांनी भाजपच्या गटनेते आणि उपगटनेत्यांची हकालपट्टी करून नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहे. त्यांच्या या कृतीने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या याच बंडखोर नगरसेवकांच्या पाठिंब्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता. त्यामुळे जळगावात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वर्चस्वालाच धक्का लागल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी मंगळवारी (६ जुलै) बैठक घेऊन गटनेते भगत बालानी यांच्या जागेवर दिलीप पोकळे यांची तर, उपगटनेतेपदी राजेंद्र पाटील यांच्या जागी चेतन सनकत यांची निवड केली आहे. बंडखोर गटाचे सभागृहनेते ललित कोल्हे यांनी महापौरांना पत्र देऊन नवीन नियुक्तीला मान्यता देण्याची मागणी केली आहे. लोकशाही पद्धतीने ठराव करून नियुक्त्या केल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
भाजपला दे धक्का
जळगाव महापालिकेत भाजपला धक्का देत भाजपच्या २९ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेचा महापौर विराजमान होऊन सत्ता काबीज केली. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला होता. बहुमतासाठी ३८ मतांची गरज होती. जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली होती, तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना २८ मते मिळाली. उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी विजय मिळविला होता.