जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुक्ताईनगर तालुक्यात अतिशय भीषण अपघात घडला आहे. एका दूध टँकरवर एकामागे एक गाड्या आदळल्या आहेत. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. पोलिस आणि आरोग्य पथक घटनास्थळी दाखल.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दूध टँकरमधून दुसर्या एका टँकरमध्ये दूध टाकण्यात येत होते. पण अचानक भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ ४ ते ५ वाहनांनी टँकरला जोरात धडक दिली. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून २ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर रात्री धुळ्याहून दूध घेऊन टँकर निघाला होता. मात्र हा टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम केले जात होते. यासाठी एक क्रेनला बोलावण्यात आले. मध्यरात्रीची वेळ असल्याने दूध शिफ्ट करण्याचे काम अन्य वाहनांना अंधारामुळे दिसले नाही.
समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेला ट्रक त्यामागोमाग २ कार आणि मागे आणखी काही वाहने अशा ४ ते ५ भरधाव वाहनांनी महामार्गावर उभ्या असलेल्या दोन्ही टँकर्स आणि क्रेनला जोरात धडक दिली. यामध्ये बंद पडलेल्या टँकरमधील ३ जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान अद्यापपर्यंत मयतांची नावे कळू शकली नाहीत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत असून लवकरच आवश्यक माहिती जाहीर केली जाणार आहे.