जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या ठिकाणी साप दिसला तर आपण लगेच अरे बापरे साप ! असे म्हणतो कारण साप बघून कोणाचीही भीतीने गाळण उडते. त्यातच तो विषारी नाग असेल तर मग विचारायलाच नको ? मात्र एका महिलेने आपल्या नवजात बाळाला सापापासून वाचविलेच इतकेच नव्हे तर तो विषारी नाग तिला डसला असताना सुदैवाने त्यातून ती वाचली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरानजिकच्या एका गावातील या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच त्या महिलेचे प्रसंगावधान आणि धाडस बघून सर्वांनी तिचे कौतुक केले आहे.
सर्पदंश विरोधी लसीची इंजेक्शन…
महिंदळे, (ता. भडगाव ) येथे भिकन नरसिंग राजपूत यांची कन्या ज्योती हिचे सासर बांभोरी, (ता. एरंडोल ) येथील असून काही दिवसांपूर्वी ती बाळंतपणासाठी माहेरी महिंदळे आली होती. तिला मुलगा झाला असून गेल्या आठवड्यात पहाटे आई व बाळ झोपेत होते, त्याचवेळी ही घटना घडली. बाळासाठी जिवाची बाजी लावणारी ज्योतीमधली हिरकणी जागी झाली आणि क्षणात तिने नागाला हातात पकडून दूर फेकले. परंतु त्याच वेळी तिला नागाने दंश केला. काही कळण्याच्या आतच ती अस्वस्थ झाली. ज्योती हिला वेळीच सर्पदंश विरोधी लसीची इंजेक्शन देण्यात आले.
असे का घडले?
खरे म्हणजे कोणतीही आई आपल्या नवजात बाळाची डोळ्यात तेल घालून काळजी घेते. परंतु रात्रीची वेळ होती आणि ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधार असतो आणि त्यातच त्या मातेला झोप लागल्याने हा प्रकार घडला. तिचे तान्हे बाळ झोपलेले होते. मात्र रात्री अचानक बाळ रडायला लागले. आईला जाग आली तेव्हा बाळाच्या अंगावर चक्क नाग असल्याचे तिने पाहीले . क्षणाचाही विलंब न करता आईने या नागाला पकडून दूर फेकले आणि एवढ्यातच नागाने तिला हाताला दंश केला.तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती खालावल्याने तिला पाचोरा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्या झुंजार आईने मात केली असून अखेर तिने ही लढाई जिंकली. डॉक्टरांनी सांगितले. तर दुसरीकडे ज्योती लवकर बरी व्हावी, यासाठी गावातील महिलांनी आता महादेवाला साकडे घातले होते. आता मंदिराचा गाभारा पाण्याने भरला असून ज्योतीच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Jalgaon Mother Cobra Sneck Fight