जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्वीच्या काळी प्रत्येक गावाबाहेर माळरानावर गायरान जमिनी होत्या, या गायरानावर गाई , म्हशी व अन्य जनावरे चरत असत, परंतु कालांतराने या गायरान जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले असे दिसून येते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले जात आहे. या कारवाईत जळगाव तालुक्यातील काही घरांचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी मोर्चा काढला. सदर मोर्चा हा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवास स्थानी जात असताना जळगाव शहरात मुंबई नागपूर महामार्गावरील उड्डाणपूलावर पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. मात्र, आता शासनाने या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याने या जमिनीवर वास्तव्य करत असलेले हजारो नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे ही कारवाई थांबविण्यात यावी आणि संबंधित नागरिकांसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचवेळी पोलिस आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची काही वेळ खडाजंगी झाली. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आल्यानंतर मंत्री गुलाब पाटील यांनी महामार्गावरच बसून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. न्यायालयाचे आदेश असल्याने यात आपल्याला काही करता येणे शक्य नाही. परंतु हा विषय जर सरकार दरबारी मांडून त्यात काही करता येण्यासारखे असेल तर ते करण्याचा आपण प्रयत्न करू, त्यासाठी तात्पुरती दोन दिवसांसाठी कारवाई स्थगित करीत असल्याचे आश्वासन आंदोलकांना मंत्री पाटील यांनी दिले. त्यांतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, यावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
मोर्चा महामार्गावर थांबल्याने त्यातच मंत्री गुलाबराव पाटील हे देखील रस्त्यावर स्थान मांडून बसल्याने दोन्ही बाजूने चांगलीच गर्दी झाली होती, मात्र पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या दिला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून दुसऱ्या बाजूने वाहने वळविण्यात आली होती. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह महिला तसेच नागरिकांची आंदोलनात प्रचंड उपस्थिती दिसून येत होती. त्यातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्पुरती कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यानंतरही पुन्हा कारवाई झाल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येईल. तसेच हा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी शमीभा पाटील यांनी यावेळी दिला.
शासकीय दौऱ्यात या मागण्यांबाबत आंदोलकांसोबत चर्चा करण्याबाबत नमूद होते. मात्र त्यानुसार आंदोलकांची भेट झाली नाही आणि आंदोलकांनी थेट मोर्चा काढला. आंदोलकांसोबत चर्चा केली असून या कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली अशी माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. मात्र आता प्रश्न कसा सुटणार याबाबत चर्चा सुरू आहे, त्याचबरोबर मंत्री रस्त्यावरच बसल्याने त्याचीही चर्चा जळगाव शहरात आणि जिल्हाभरात होत आहे.
Jalgaon Minister Golabrao Patil Agitation Protesters