मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.
खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडू सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे या भागातील खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 36 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदाने, धावपटूसाठी ट्रॅक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलसाठी मैदान, टेनिस कोर्ट आदींसह खेळाडूंना लागणाऱ्या अद्ययावत सोयीसुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
Jalgaon Mehrun Sankul Girish Mahajan