जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या “कार्यालयीन सुधारणा” विशेष मोहिमेच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावून नवा इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विशेष अभिनंदन पत्र देऊन सन्मानित केले. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव मा. श्रीमती सुजाता सौनिक यांचीही उपस्थिती होती.
प्रशासनाच्या या यशामागील महत्त्वाचे टप्पे:
- पारदर्शक व गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी
- नागरिक सेवा सुविधा सुधारणा आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे
- नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व डिजिटल प्रशासनाचा विकास
- अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे
- संकेतस्थळ सुधारणा व ऑनलाइन सेवा पोहोचविणे
या उल्लेखनीय यशामुळे जळगाव जिल्हा राज्यभर एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. महसूल विभागाच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले असून, संपूर्ण जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.