जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील उद्योग-व्यापार क्षेत्राच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी आज गुरूवार दि. 9 मार्च रोजी उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न होणार असल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी व जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका संगीता पाटील यांनी दिली.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ च्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी जळगांव जिल्हा विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत जळगांव जिल्ह्याच्या उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती. परिषदेचे उद्घाटक उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांनी जळगांव जिल्ह्याच्या उद्योग-व्यापार क्षेत्राच्या प्रश्नांसंबंधी मुंबईत बैठक आयोजित करण्याची घोषणा केली होती.
जळगांव जिल्ह्याचे विविध प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने उद्योग मंत्र्यांच्या बैठकीकडे जळगांव जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.
या बैठकीस आमदार सुरेश भोळे, हर्षदीप कांबळे – प्रधान सचिव (उद्योग), दिनेश वाघमारे- प्रधान सचिव (उर्जा), विनिता सिंगल – प्रधान सचिव (कामगार), दिपेंद्र कुशवाह – विकास आयुक्त (उद्योग), विपिन शर्मा – मुख्य कार्यकारी अधिकारी – म.औ.वि.म., विजय सिंघल – व्यवस्थापकीय संचालक – महावितरण, अमन मित्तल जिल्हाधिकारी-जळगांव, सह मुख्य कार्यकारी अधिकारी-मऔविम, सह सचिव-उद्योग विभाग, प्रादेशिक अधिकारी-मऔविम धुळे, उप विभागीय अधिकारी प्रांत/तहसिलदार, जळगांव हे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याने अनेक प्रश्नांवर निश्चित निर्णय होण्याची अपेक्षा असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.
ही बैठक जळगांवच्या विकासासाठी महत्वपूर्ण सुरूवात ठरेल असा विश्वास ही ललित गांधी यांनी व्यक्त केला.
Jalgaon Industry Development Issue Meet Today