एरंडोल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत काळजीवाहकाने एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणात केअरटेकर, संस्था अध्यक्ष व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच अल्पवयीन मुलींसह बालकाचेही शोषण !
खडके बुद्रुक येथे तळई येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ मुला-मुलींचे के बालगृह आहे. या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात काळजीवाहक गणेश पंडित हा पोलिस कोठडीत आहे. शनिवारी बालगृहातील ११ वर्षीय बालकानेही पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.
काय म्हटलंय नेमकं तक्रारीत !
होळीच्या दिवशी अल्पवयीन बालकाने पाणी भरले नाही म्हणून वसतिगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित याच्या सांगण्यावरून आठ विधिसंघर्षित बालकांनी पीडित बालकास लाथाबुक्क्यांनी पाठ, छाती व पोटावर मारहाण केली होती. तसेच एका रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पीडित बालक वॉशरुमला गेला असताना गणेशने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केला. ही घटना संस्थेच्या अध्यक्ष व शिक्षकांना सांगितली पण त्यांनीही दुर्लक्ष केले. जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीनंतर अल्पवयीन बालकावरदेखील अत्याचार केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन बालकांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.
मारहाण करणाऱ्या आठ मुलांविरुद्ध गुन्हा !
पीडित बालकाच्या तक्रारीवरून काळजीवाहक गणेश पंडित, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील, भूषण प्रभाकर पाटील यांच्यासह बालगृहातील आठ अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन व भूषण फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर काळजीवाहक शिवाजी पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.