जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकली. एकाचवेळी ग्रुपच्या सर्व ठिकाणांवर टाकलेल्या या छाप्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई संदर्भात ग्रुपचे प्रमुख तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी माहिती दिली आहे.
जैन म्हणाले की, ईडीने तपासा दरम्यान दागिने, रोकड सील करण्याची जी कारवाई केली ती कायदेशीररित्या चुकीचीच आहे. माझ्या नातवांच्या फर्मचा कुठलाही संबंध नसताना, त्यांचीही रोकड तसेच मुद्देमाल सील केली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत.
गुरुवारी ईडीने सकाळी राजमल लखीचंद ज्वेलर्सवर धाड टाकली होती. पण, ईडीने कारवाईबाबत कोणतीच माहिती दिली नाही. त्यानंतर आज ईश्वरलाल जैन यांनी या कारवाईची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, मुलाने स्टेट बँकेच्या विरोधात केसेस केल्या आहेत. तो त्या केसेस मागे घेत नसल्यामुळे बँक तडजोड करायला तयार नाही. त्यामुळेच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे होईल ते कायद्यानुसार होईल असेही त्यांनी सांगितले.
सीबीआयच्या फिर्यादीनुसार ईडीने तपास करताना जी कारवाई केली आहे, ती मला चुकीची वाटत आहे. माझ्या नातवांच्या नावाने आलेले एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे. त्याचा आर.एल ग्रुपशी कुठलाही संबंध नाही. त्यांना जबाबदार सुद्धा धरलेले, ते स्वतंत्र आहेत, असे असतांनाही त्यांच्याशी संबंधित गोष्टी सुध्दा सिल केल्या जात आहेत. हे चुकीचे आणि गैर आहे. त्यासाठी मला भांडावे लागले असेही जैन यांनी सांगितले.
तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून जी कागदपत्र मागण्यात आली ती आम्ही त्यांना दिलेली आहेत. तसेच आमची कुणाचीही चौकशी झालेली नाही. आमचे जबाब घेतलेले आहेत. त्यात मी असेल माझा मुलगा मनीष जैन असेल असे आमचे जबाब नोंदवले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आम्हाला समन्स दिले आम्ही चौकशीसाठी जाऊ असेही ते म्हणाले.
Jalgaon ED Raid Rajmal Lakhichand Group Ishwarlal Jain
Enforcement Directorate RL