जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा दूध संघाच्या एका बड्या अधिकाऱ्यावर माजी लोकप्रतिनिधी तथा संघाचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने पिस्तुल रोखल्याची मोठी चर्चा शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात सुरु आहे. मात्र, या घटनेविषयी कुणीही बोलायला तयार नाही.
पिस्तुल रोखल्याच्या घटनेबाबत दोन वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पहिल्या कथेनुसार जिल्हा दूध संघाची शनिवार बैठक होती. एक बडा अधिकारी बैठकीतून उठून गेल्यानंतर सुमारे तास दीड तास ते बैठकीला आलेच नाही. त्यामुळे संघाचा पदाधिकारी तथा एका माजी लोकप्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. अधिकारी बैठकीत परत असल्यावर दोघांमध्ये बैठकीतच शाब्दिक चकमक होवून तूतू मैं मैं झाली. यानंतर माजी लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यावर पिस्तुल रोखल्याचे बोलले जात आहे.
तर दुसऱ्या घटनेत शनिवारी जिल्हा दूध संघात बैठक होती. बैठकीनंतर एका माजी लोकप्रतिनिधीला बराच वेळ बाहेर बसून ठेवण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या लोकप्रतिनिधीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर थेट पिस्तूल रोखली, अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनासह दुध संघातील राजकीय तथा प्रशासकीय अधिकारी देखील या घटनेबाबत बोलायला तयार नाही.