आपली पेन्शन आपल्या दारी
विशेष अर्थ सहाय योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अभिनव उपक्रम
सामाजिक विशेष अर्थ सहाय योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृद्ध, अनाथबालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक अर्थसहाय वितरीत करण्यात येते.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय एकरकमी अर्थसहाय या योजनेच्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. दिव्यांग, वयोवृद्ध, दुर्धर, आजारी व्यक्ती व इतर लाभार्थ्यांना बँकेत जावून त्यांचे अर्थसहाय आवश्यकतेनुसार काढावे लागते. दरवेळी या लाभार्थ्यांना बँकेत जाणे शक्य होईलच असे नाही. तसेच त्यांच्या घरापासून बँकेचे अंतर, बँकेतील गर्दी, या अशा कारणांमुळे अर्थसहाय काढतांना लाभार्थ्यांचे श्रम, वेळ व पैसा खर्च होतो व त्यांना कष्ट पडतात, अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट खात्यामार्फत राबविण्यात येणारी ‘आपली पेन्शन आपल्यादारी’ योजना लाभार्थ्यांना अधिक मदतकारी ठरु शकते. यात लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा असलेले अर्थसहाय इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे कर्मचारी/ प्रतिनिधी लाभार्थ्यांच्या घरी जावून आधार क्रमांक पडताळणी आधारित प्रक्रियेने Adhar enabled payment system-(Aeps) लाभार्थ्यांना अर्थसहाय अदा करु शकतात.
इंडिया पोस्ट बँकेचे कर्मचारी हँडहेल्ड डिवाईसवर लाभार्थ्यांच्या आधार पडताळणीकरिता अंगठा/बोंटाचा ठसा घेतील व लाभार्थ्यांच्या आधार पडताळणीनंतर त्याच्या बँकेतील जमा रकमेतून लाभार्थ्यांने मागणी केल्याप्रमाणे अनुदान त्यास अदा करतील.यात आधार पडताळणी होवू न शकल्यास अशा लाभार्थ्यांना निवृत्ती वेतन घरपोच अदा करता येणार नाही, अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँकेत जावून आपले निवृत्तीवेतन काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
याकरिता लाभार्थ्यांकडून कुठलीही फी किंवा शुल्क इंडिया पोस्ट बँकेकडून आकारण्यात येणार नाही. सदर योजना विनामूल्य व ऐच्छिक स्वरुपाची आहे. यात लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांक त्याच्या बँक खात्याशी संलग्न (link) असणे गरजेचे आहे. सध्या ही योजना राष्ट्रीयकृत बँकांसाठी लागू राहील आणि यात कुठलेही बँक खाते लाभार्थ्यांना बदलण्याची गरज नाही. लाभार्थ्यांच्या योजनेचे मूळ बँक खाते तेच राहील. यात लाभार्थ्यास त्याच्या बँक खात्यात जमा असलेल्या रक्कमेतून रु. 10,000/- मर्यादेपर्यंत रक्कम काढता येईल.
जळगाव जिल्ह्यात 1 जुलै, 2022 पासून विशेष सहाययोजनेच्या 100% लाभार्थ्यांना ‘आपली पेन्शन आपल्यादारी’ या योजनेअंतर्गत अर्थसहाय घरपोच वाटप करावयाचे आहे. याकरिता गावनिहाय विशेष सहाय योजनेच्या लाभार्थींची तलाठी व इंडिया पोस्ट बॅंकेच्या अधिकारी/कर्मचारी यांनी गावात बैठक घ्यावी.
लाभार्थ्यांना सदर योजना समजावून सांगावी, तसेच या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दयावे, असे निर्देश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव यांनी सर्व तहसिलदार व संजय गांधी निराधार योजना शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिले आहेत. याकरिता व्यापक प्रसिद्धि करण्याच्या सूचना तहसिलदार व इंडिया पोस्ट बँकेचे अधिकारी यांना यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.
या योजनेसंदर्भात राऊत म्हणाले की, समाजातील अनेक वृद्ध निराधार,दिव्यांगजनासाठी शासनाने विविध आर्थिक लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ समाजातील अनेक लाभार्थ्यांना मिळत आहे. सदर लाभार्थी हे वृद्ध, दिव्यांग, आणि निराधार असल्याने त्यांना योजनेमधून मिळणारे आर्थिक सहाय काढण्यासाठी बँकापर्यंत जावे लागते. त्यांना त्यासाठी शारीरिक श्रम पडावयाचे त्याच बरोबर सार्वजनिक वाहनाने जावयाचे झाल्यास त्यांना आर्थिक भुर्दंडही पडावयाचा.आता ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना त्यांचे अर्थ सहाय घरपोच मिळेल.’
jalgaon district collector abhijit raut initiative 1 july 2022 pension scheme at home