जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धरणगाव येथे एका ६२ वर्षांच्या वृद्धाने दोन अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी धरणगावकरांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळेच धरणगावकरांनी आज उत्स्फुर्तपणे मोठा मोर्चा काढला. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची एकमुखी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी शांततेचे आवाहन केले असून आरोपी सध्या कोठडीत आहे.
धरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे (वय ६२) याचा पीठाच्या गिरणीचा व्यवसाय आहे. पाच आणि आठ वर्षांच्या आपल्या मुलींना घेऊन एक महिला दळणासाठी गिरणीत आली होती. मुली गिरणीच्या अंगणात खेळत होत्या. त्यानंतर ती महिला दळण घेऊन घराकडे निघाली. तिला लक्षात आले की, मुली अजून तिथेच खेळत आहेत. त्यानंतर ती गिरणीत आली असता तिला धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. मराठे याने दोन्ही मुलींना मांडीवर बसवून अश्लील चाळे करीत होता. त्यानंतर महिलेने आपल्या पतीसमवेत पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. त्यानंतर मराठे याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर, त्याचा मुलगा भूषण यालाही ताब्यात घेण्यात आले. भूषण याने तक्रारदाराला धमकावल्याचा आरोप आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला कोठडी सुनावण्यात आली असून धरणगाव पोलिस कसून तपास करीत आहेत.
धरणगावकरांनी या निंदनीय प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच आज सकाळी धरणगावकरांनी उत्स्फुर्तपणे मोर्चा काढला. आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि असे प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. तर, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांनी शांततेचे असून कायदा हातत न घेण्याचे आवाहन केले आहे. आरोपी जेरबंद असून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.