जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दिवसांपासून राज्यातील राजकीय भूकंपाची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, या चर्चांना पूर्णविराम मिळत नाही तोच आता धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राज्यभरातच चर्चेची ठरत आहे. कारण, याठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते व उपमुख््यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी अजित पवार यांचा फोटो झळकतो आहे.
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट मैदानात उतरला आहे. या प्रचारपत्रकासह फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो असल्याने खांदेशात चांगला चर्चेचा विषय ठरत आहे. वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये धरणगाव वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असा सामना होत आहे.
धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी युती करून सहकार पॅनल रिंगणात उतरविले आहे. राज्यात जरी भाजप व शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधक असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र धरणगावातील बाजार समितीच्या निवडणुकीत हे तिघही पक्ष एकत्र झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असल्याचा पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी शिवसेना-भाजपसोबत युती करीत बाजार समितीत उमेदवार उभे केले आहेत. याआधीही दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवारांनी शिवसेना-भाजपला साथ दिली होती. धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप- शिंदे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे. अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शेतकरी टिकेल तर शेत पिकेल, असे म्हणत भाजप- शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सहकार पॅनल या निवडणुकीत उभे करण्यात आले आहे. भाजप- शिंदे गटाच्या पॅनलचे नेतृत्व करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेते राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा मतदारसंघ असल्याने या दोघांची यात परिक्षाच ठरणार आहे.
Jalgaon Dharangaon APMC Election Politics NCP Shivsena BJP