मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोहाळ जेवण हा आता एक इव्हेंट झाला आहे, हे आपण सारेच जाणतो. पूर्वी घरच्या अंगणात होणारा कार्यक्रम आता भल्या मोठ्या हॉलमध्ये एखाद्या पार्टीसारखा होऊ लागला आहे. पण आपण इथे एखाद्या महिलेच्या डोहाळ जेवणाची कहाणी ऐकणार नसून चक्क गाईच्या डोहाळ जेवणाचा किस्सा ऐकणार आहोत.
ही घटना आहे जळगावातील. जळगावात एका गाईच्या डोहाळ जेवणाचा खास इव्हेंट करण्यात आला. आणि यात छप्पन भोग जेवणाच्या प्रसादाचा थाटही घालण्यात आला. या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व महिलांना छप्पन भोग जेवणाची मेजवानी देण्यात आली. गाईवर एखाद्या लेकीप्रमाणे प्रेम करण्याचा हा प्रसंग दुर्मिळच म्हणावा लागेल. जळगावच्या ज्ञानदेव नगरातील नगरसेवक प्रवीण कोल्हे व त्यांचं कुटुंब आज नव्हे तर गेल्या अनेक पिढ्यांपासून गाईवर कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रेम करत आले.
गाईवर तेवढीच नितांत श्रद्धा आणि तेवढच प्रेम आजही सगळे करतात. यात भर म्हणून आपल्या घरच्या गाईला गरोदर असताना डोहाळ जेवण घालण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी विधिवत सोहळा करण्याची तयारी त्यांनी केली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रातून या कृतीचं कौतुक होऊ लागलं. बारामतीमध्येही एका कुटुंबानं असाच सोहळा ओयोजित केला होता. त्यात त्यांनी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व महिलांना पैठणी भेट दिल्याची चर्चा झाली होती.
पंचपकवान्नाची मेजवानी
जळगावातील कोल्हे कुटुंबाने एखाद्या गरोदर महिलेसाठी करतात तशी सजावट गाईसाठी केली होती. छान पंचपकवान्न तयार केले होते. छप्पन भोग जेवणाचा प्रसाद गाईला दिला. आणि त्यानंतर सर्व पाहुण्यांनाही या शाही मेजवानीचा आनंद लुटता आला.
हा तर आदर्श
मुक्या प्राण्यांवर प्रेम करा हा संदेश आपल्या कृतीतून देणाऱ्या कोल्हे कुटुंबानं समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. एकीकडे गायींची कत्तल होत असताना आणि गायीवरून राजकारण होत असताना आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण गायीवर कसं प्रेम करू शकतो, हे कोल्हे कुटुंबानं दाखवून दिलं आहे.
Jalgaon Cow Dohale Jevan Special Ceremony