जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सध्या वेगळीच चर्चा आहे. निमित्त आहे ते ‘भावी मुख्यमंत्री अजितदादा’ असा उल्लेख असलेले मोठ्या होर्डिंग्जचे.
जळगाव शहरातील विविध भागात झळकल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. २२ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यातच जळगाव शहरात अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले व जिल्हा उपाध्यक्ष बंगालसिंह चितोडीया यांनी विविध चौकात लावलेल्या होर्डिंग्जवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे पुढील महिन्यात ते मुख्यमंत्री होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे म्हटले होते. तेव्हापासून त्यांची मुख्यमंत्रीपदाची चर्चा जोर धरुन आहे. सध्या राज्याचे राजकारण हे मुख्यमंत्रीपद या एकाच विषयाभोवती फिरताना दिसत आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे का? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, या होर्डिंग्जवर शरद पवार यांचाही फोटो असल्यामुळे अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत.