भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १२ हजाराच्या लाच प्रकरणात भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे व खासगी इसम हरिष ससाणे हे दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १५ हजाराची मागणी केली होती. पण, तडजोडीअंती १२ हजाराची लाच स्विकारतांना हे दोघे अडकले,
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी २०२२ मध्ये ता . भुसावळ जि . जळगांव मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे सु .२ एकर. शेतजमीन विकत घेतली आहे .सदर शेत जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर तक्रादार यांचे स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे प्रकरण सादर केले होते. सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटले असता त्यानी तक्रारदार यांना मी तुमचे सातबाराच्या उताऱ्यावर नाव मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्या कडून करून आणुन देतो असे सांगून पंधरा हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी ला. प्र. वि.जळ्गाव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील रविंद्र धांडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे प्रथम पंधरा हजार रुपये व तडजोडीअंती बारा हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यानंतर हे पैसे हरिष ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितले. यातील खाजगी इसम ससाणे यांनी तक्रारदार यांचे कडून बारा हजार रुपये धांडे यांच्यासाठी स्वतः पंचा समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या दोघां विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ला.प्र.विभागाचे पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सापळा पथकातील दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रदिप पोळ, सुरेश पाटील, अशोक अहिरे.सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल पाटील, राकेश दुसाने,सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकुर यांनी केली.
Jalgaon Bhusawal ACB Raid Trap Bribe Corruption