इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यात पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ भरधाव ट्रकने एका दुचाकी वाहनास धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठातील महंत प्रियरंजनदास गुरु आचार्य महान साहेब (वय ३५) हे जागीच ठार झाले. तर त्यांना दुचाकीवरुन घेऊन जात असलेला प्रवीण नारायण पाटील (वय २३) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे तातडीने दाखल करण्यात आले.
मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला रास्ता रोको केला. त्यानंतर संतप्त नागरिकांची संवाद साधून तहसीलदार प्रदीप पाटील व पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी वाहतूक सुरळीत केली.
घटनास्थळी यापूर्वी देखील अनेक वेळा गंभीर अपघात घडलेले असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वी नॅशनल हायवे ऑफ इंडियाचे प्रकल्प अधिकारी यांना वारंवार स्पीड ब्रेकर व समांतर रस्ते तयार करण्यासंदर्भात निवेदन दिलेली आहे. तथापि त्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्याबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळावरून प्रकल्प अधिकारी साळुंखे यांच्याशी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सूचित केले.
असा झाला अपघात
महंत प्रियरंजनदास आचार्य हे एका चार चाकी वाहनाने जळगावहून पिंपरी फाट्यावर उतरले. त्यांना पिंपरी बुद्रुक येथे नेण्यासाठी प्रवीण नारायण पाटील हा युवक दुचाकी घेऊन आला होता. महंत दुचाकीवर बसले तोच ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे महंत जागीच ठार झाले. महंत हे जवळपास चार वर्षापासून पिपंरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते. ते बंगळुरु येथे कबीर पंथी धार्मिक कार्यक्रमसाठी १५ दिवस हजेरी लावून पिंपरी बुद्रुक येथे परत येत असतांना हा अपघात झाला. त्यांच्या निधनाने कबीर पंथी नागरिकांमध्ये शोक कळा पसरली आहे.